Saturday 20 August, 2011

कोकणातील गणेशोत्सव -काही आठवणी

मला समजायला लागल्यापासून जर पहिला सण समजला आणि आवडला असेल तर तो म्हणजे गणेश चतुर्थी.

अजूनही लहानपणीचे मखमलि दिवस आठवतात. गणपतीच्या मूर्ती शाळांची लगबग जून महिन्याच्या सुरवातीस चालू व्हायची.
सगळ्यात पहिलं काम असायचं , गणपतीचा पाट शाळेत पोचवणे . खूप उत्साहाने आम्ही ते काम करायचो. मग सुरवात व्हायची ती आपल्या बाप्पाच्या मुर्तीची कितपत तयारी झाली ते पाहणं. त्या शाळांमधे अनेक प्रकारचे गणपती बनायचे , कोणाचा उभा , कोणाचा बाहूली गणपती तर कोणाचा शंकर पार्वती आणि मधेच गणपती. गणपती बनवायच्या मातीला सुधा एक छान सुगंध असायचा. ते महिने बहुतेक सणासुदीचे असल्याने सुट्या जास्त असायच्या. आम्ही सगळे मग निघायचो ते गणपतीच्या शाळेत . तिथे गणपती बनवणार्याना जमेल तशी उत्साहाने मदत करायचो. पण मूळ उद्देश असायचा तो आपला आपला गणपती बनताना पहाणे . शेवटच्या ८/१० दिवसात बहुतेक गणपती रंगवून तयार असायचे . वर्तमान पत्रात झाकलेले. आम्हाला उत्सुकता असायची की आपला बाप्पा कसा दिसतो ते पाहण्याची. पण शाळेचे मालक खबरदारी म्हणू न आम्हाला दम देऊन पीटाळायचे. आमचा पुरता हिरमोड व्हायचा. मला मात्र त्या तैल रंगांचा उग्र वास खूप आवडायचा .


चतुर्थी पुर्वी चार दिवस घर सफाई चालू व्हायची. सगळे जन सकाळीच उठून योध्या सारखे घर सॉफ करायला तयार व्हायचे. जुनी मातीची घरं असल्यामुळे आणि नळे असल्याने खूप जळमटे असायची. सगळेजन काळेठिक्कर व्हायचे. त्याच अवस्थेत गरमागरम भाकरी , पेज खायला एक वेगळीच मजा यायची.

शेवटच्या दोन दिवसात चालू व्हायची ती मखर बंधायची तयारी. कोण तरी त्यातल्या त्यात बरासा चित्रकार भिंतीवर एक निसर्ग चित्र आपल्या भाषेत काढून जायचा. तेव्वा आता सारखी तयार थर्मकोल ची कृत्रिम मखरा मिळत नव्हती. (एका अर्थी बरच होतं).

मखर बनवायला बहुदा सगळ्याच घरात एकाच प्रकारच्या वस्तू वापरल्या जायच्या. बहुतेक सगळ्या नैसर्गिक. एक रंगीत घोटीव कागद सोडला तर. अगदी चिकटवायला गम सुधा नैसर्गिक..लक्षात नाही पण कसल्या तरी पीठापासून बनायचा. बाकी साहित्य म्हणजे बांबू, ताडाच्या झाडाची पाने. मांडी सजवायला पिवळ जर्द हरिण, लाल, नारिंगी रंगाचा कवंदळ नावचा फळ, आणि बर्‍याच श्रावणात उगवणार्या वनस्पतींची पाने. जर कोणी चाकरमन्याने मुंबई हून तयार पडदे आणले असतील तर मग सोन्या हुनही पिवळे. अखेर अगदी शेवटच्या रात्री पर्यंत जागून मनासारखे मखर तयार असायचे. मग शेजारी जाऊन इतर मखर बघून यायची. आणि उगाचच खुश व्हायचं. आपलच मखर छान समजून.

अखेर ज्याची इतक्या महिन्या पासून वाट पाहत होतो ती सकाळ उजाडयची. आई, बाबा, आजी कडून ३/४ रुपये उखळून लवनग्या फटाक्यांच्या माळा तयार असायच्या . मग गणपती बाप्पा मोरया च्या जल्लोषात बाप्पाच घरात आगमन व्हायचं.

मग आरत्या, भजन , पंगती, मोदक, करंज्या, ह्यामधे सगळेजन दंग होऊन जायचो. एवढे दिवसभर करून सुधा डोळ्याला डोळा लागत नसायचा. कारण आजीने सांगून ठेवलेलं असायचं की गणपतीच्या समोरची समई अखंड  तेवत राहिली पाहिजे. मग काय रात्रभर समई कडे पाहत डोळा कधी लागायचा समजायाच देखील नाही. चतुर्थी चे ५/६ दिवस कसे निघून जायचे समजायचं देखील नाही. अगदी विसर्जन होई पर्यंत. अजुन आठवत लहानपणी गावचे काका कौतुकाने गणपतीच्या अंगावरच जानव माझ्या गळ्यात घालायचे. मग घरातले नदीवरुन परत ताना बोलायचे आता तू गणपती आहेस , मासे , कोंबडी नाही खायची. मग मी सुधा तोंड करून नाही खाणार सांगायचो. ( दोन दिवसानी ते उतरवून ठेवायचो ही गोष्ट वेगळी) . घरी आल्यावर मात्र सगळं घर भकास वाटायचं. गणपतीच्या खोलीत तर समई सोडून नको नकोसा वाटणारा अंधार दाटायचा.
मग शांत पणे अंधाराचा आधार घेऊन घरच्या उंबरयावर बसायच. ना भूक लागायची ना झोप. फक्त दिसायचा तो बाप्पा. हसत चेहरयाचा. मग हळूच आजी बाजूला येऊन बसायची आणि विचारायची " काय रे झिला , काय झाला?? चल भाकरी खावक. " मी रडकुंडिला येऊन बोलायचो" काय नको माका .. आये ( आजी) बाप्पाक कायमचो कित्याक नाय ठेवीत  आपल्या कडे???
मग आजी हसायची आणि सांगायची " अरे झिला तो तर पावनो आपलो, तेका आपल्या घराक जावक नको??? " आणि तो नाय गेलो तर मग पुढच्या वर्ष हाडतलस  कसो तेका?? " त्या वेळच ते आजीच उत्तर एकतर समर्पक होतं किवा माझ्या बाळ बुद्धीला समर्पक वाटायचं.

मग मनातल्या मनात शेवटची वेदना उठायची " गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या !!!


आता मात्र सगळं बदललय. रेडिमेडचा जमाना आलाय. हल्ली घाईच्या जमान्यात वेळ सुधा नाही पुरत...पण खरच त्या वेळची मजा काही औरच होती. ज्यानी अजुन पर्यंत गावाचा गणपती उत्सव पहिला नसेल त्यानी एकदा तरी नक्की पाहून या... परत परत जाल ह्याची हमी मी देतो.......संदेश बागवे

No comments:

Post a Comment